महिलांमध्ये पुरुषांपेक्षा थायरॉइडची समस्या २ ते ३ पटीने जास्त असते. याचे प्रमाण १० महिलांमध्ये १ असे आहे. गरोदर असताना ही समस्या २० ते ३० पटीने वाढते. थायरॉईड ही गळ्यामधील महत्वपूर्ण ग्रंथी असून तिच्यातून थायरॉइड्सच्या हार्मोन्सची निर्मिती होते आणि थायरॉईड हार्मोन्स आपल्या शरीरातील मोटाबॉलिज्म संतुलित ठेवण्यात मदत करते, आपल्या मेंदूला, हृदयाला, स्नायूला, पचनक्रियेला आणि गर्भधारणेसाठी फार महत्वाचे असतात.
थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती कमी झाली तर त्याला हायपोथायरॉईडीजम असे म्हणतात आणि काही कारणामुळे थायरॉइडची निर्मिती जास्त होऊ लागली तर त्याला हायपरथायरॉइडिज्म असे म्हणतात.
जाणून घेऊयात थायरॉईडची समस्या कशामुळे होते?
मुख्यत: हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड हे ऑटोइम्युन डिसऑर्डरमुळे होतात. जेंव्हा पांढऱ्या पेशी आपल्या थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करतात त्यामुळे त्या जखमी होऊन ऑटोइम्युन डिसऑर्डर होते. मग ही जखम झालेली ग्रंथी एकतर थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती जास्त करते किंवा कमी करते यालाच ऑटोइम्युन हायपोथायरॉईडझम किंवा ऑटोइम्युन हायपरथायरॉईझम असे म्हणतात.
हायपोथायरॉईडझमची अनेक करणे आहेत. आपल्या शरीरात आयोडीनची मात्रा कमी झाली तर हायपोथायरॉईडझम होऊ शकते. आयोडीन हे थायरॉइडच्या हार्मोन्स निर्मितीसाठी फार आवश्यक असते. आयोडाईन हे आपल्याला दुधामध्ये, मिठामध्ये, समुद्रातील मासे किंवा अंड्यांमधून मिळू शकते. कधीकधी अती प्रमाणात आयोडीन किंवा अती औषधांमुळे सुद्धा होऊ शकते.
हायपोथायरॉइडिज्मची लक्षणे कोणती?
हायपरथायरॉइडिज्म मध्ये आपली कामे हळुवार होऊ लागतात. आपल्या विचारधारेवर परिणाम होतो, स्थूलपणा येतो, आपल्याला थंडी सहन होत नाही, त्वचा कोरडी राहते, केस गळू लागतात आणि हृदयाची ठोके हळूवार होतात. महिलांमध्ये मासिक पाळीवर परिणाम होतो.
पुण्याच्या डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट फिजिशियन डॉ प्रसाद कुवळेकर यांच्या मते “थायरॉईड विकारांमुळे तारुण्य आणि मासिक पाळी असामान्यपणे लवकर किंवा उशिरा येऊ शकते. याव्यतिरिक्त, थायरॉईड संप्रेरकांच्या असामान्यपणे उच्च किंवा कमी पातळीमुळे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात, अनियमित मासिक पाळी किंवा अनुपस्थित मासिक पाळी (अमेनोरिया नावाची स्थिती), प्राथमिकतः वंध्यत्व येऊ शकते. थायरॉईड विकारांमुळे रजोनिवृत्ती लवकर सुरू होऊ शकते (वयाच्या ४० च्या आधी किंवा ४० च्या सुरुवातीनंतर ). ओव्हरएक्टिव्ह थायरॉईडची (हायपरथायरॉईडीझम) काही लक्षणे लवकर रजोनिवृत्तीसाठी देखील चुकीची असू शकतात. यामध्ये मासिक पाळीचा अभाव, हॉट फ्लॅशेस, झोप न येणे (निद्रानाश) आणि मूड बदलणे यांचा समावेश होतो. हायपरथायरॉईडीझमचा उपचार केल्याने काही वेळा लवकर रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होतात किंवा लवकर रजोनिवृत्ती येण्यापासून रोखता येते.”