दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. एकीकडे आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. लहानपणी शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की, त्या दिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा? नेमकं काय नवीन करता येईल? हे चक्र डोक्यात फिरू लागायचं. महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे. त्याला आपल्या पुवर्जांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे. थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमी, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. पण, दिवाळीत किल्ला का बनवतात? हा प्रश्न उपस्थित होतोच.
आपल्या घरातील वडिलधारी मंडळी सांगतात की, "किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळत होताच. किल्ला हे शौर्याच ध्येयाच प्रतिक मानल्या जात.दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेच बिज मनामध्ये रुजवण्यांच काम होत. शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले."
या व्यतिरिक्तही दिवाळीत किल्ला बांधण्यामागे काही कारणं आहेत. जाणून घेऊया किल्ला बांधण्याचा इतिहास -
*काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली होती. येणाऱ्या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. किल्ल्यांवर सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.
*मनुष्याचा देह हा किल्ला आहे. देहबुद्धी ही किल्ल्याप्रमाणे (जन्मोजन्मीचे संस्कार आणि षड्रिपू यांमुळे स्वस्वरूप किंवा आत्मबुद्धी झाकली जाते) आहे. काही किल्ले भेद्य आणि काही अभेद्य आहेत, असे वाटते. प्रत्यक्षात प्रत्येक किल्ला भेद्य आणि त्याच्यावर विजय मिळवता येण्यासारखा असतो. त्याप्रमाणे देहबुद्धीरूपी किल्ल्याला भेदून आत्मबुद्धीरूपी धर्मपताका फडकवणे, म्हणजेच आत्मस्वरूप जाणून त्यामध्ये स्थिर होणे, हे मनुष्यजन्माचे ध्येय आहे.
*किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे. या रूढीतून हीनानि गुणानि दूषयति इति हिंदु या व्याख्येनुसार अंतरात म्हणजे पिंडामध्ये हिंदवी स्वराज्याची (ईश्वरी राज्याची) स्थापना करणे हा व्यष्टी उद्देश युवा पिढीने स्वतःवर बिंबवणे आवश्यक आहे.
*शत्रूच्या कह्यातील किल्ला लढून जिंकणे आणि त्यावर आपला झेंडा फडकवणे, म्हणजे पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र होणे. दिवाळी ही अंधारावर विजयाचे आणि प्रकाशाकडे जात असलेल्या प्रवासाचे द्योतक आहे. या अर्थाने दिवाळी हा पारतंत्र्यावर विजय अन् स्वातंत्र्याच्या प्रकाशाची अनुभूती देणारा सण आहे.
*सिंहासन हे निर्गुण ब्रह्माचे, म्हणजे शाश्वत सत्तेचे प्रतीक आहे. राजा हे सगुण ब्रह्म, ज्याचा कालानुरूप लय होतो, अशा अशाश्वत ब्रह्माचे प्रतीक आहे. देहधारी राजा काळाप्रमाणे पालटतो; मात्र सिंहासन तेच असते. हे जिवाचे मूळ स्वरूप (आत्मा) आणि देहस्वरूप (नाशवंत शरीर) यांचे प्रतीक आहे.
*सिंहासनाचे सिंहाच्या मुखाने बनलेले दोन हात निर्गुण ब्रह्माच्या मारक रूपाचे, म्हणजे क्षात्रतेजाचे प्रतीक आहे. सिंहासनाची पाठ ब्राह्मतेजाचे म्हणजे तारक रूपाचे प्रतीक आहे. सिंहासनावरील छत्र हे निर्गुण ईश्वरी कृपेच्या, म्हणजे तारक-मारक रूपांचे प्रतीक आहे. *सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू अन् असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवले आहे, याचे प्रतीक आहे.
*सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वरी राज्याच्या संस्थापकाचे प्रतीक आहे.
(सदर मजकूर – सनातन संस्थेच्या सौजन्याने)