सुंदर चेहरा आणि आकर्षक उरोज ही स्त्रियांची सौंदर्यस्थळे आहेत. कोणत्याही वयाच्या स्त्रीला आपला उरोभाग उठावदार व आकर्षक असावा, असे मनापासून वाटत असते. विविध कारणांनी, वयोमानानुसार हे उरोज बेडौल होतात. त्यांना आकार देण्यासाठी व त्यामध्ये कसाव निर्माण होण्यासाठी हे व्यायाम उपयुक्त ठरतील.
1 भिंतीपासून साधारणपणे 2 फूट अंतर ठेवून उभे राहा. हात खांद्याच्या रेषेत आणा. शरीर ताठ ठेवून, शरीराचा वरचा भाग पुढे झुकवून हात भिंतीला टेकवा. मग हातांवर जोर देत मागे, पूर्व स्थितीत या. हात कोपरातून वाकवत पुढे झुकणे व मागे येणे या क्रिया किमान 10 वेळा करा. हळूहळू वाढवत 20 वेळा करा.
2 सरळ उभे राहा. किंचित गुडघे वाकवा. दोन्ही हात वर उचलून खांद्याच्या रेषेत आणा. हात कोपरातून वळवून कानाच्या समांतर आणा. काही क्षण थांबून छातीचे स्नायू आत खेचा. त्याचबरोबर हात चेहर्यासमोर आणून बोटात बोटे गुंतवा. ही अवस्था सोडा अन् पुन्हा पहिल्यापासून ही क्रिया किमान 10 वेळा करा.
3 सरळ उभे राहा. उजव्या हातात झेपतील एवढ्या वजनाचे डम्बेल धरा. डावा पाय पुढे टाका. कंबरेत पुढे झुका आणि डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. डम्बेल धरलेला उजवा हात खाली आणा. मग हा हात उजवीकडे कंबरेपर्यंत आणा. पुन्हा खाली आणा. ही क्रिया साधारणपणे 10 ते 12 वेळा करा. नंतर दुसर्या बाजूने करा.
4 जमिनीवर (मॅट टाकून) झोपा. दोन्ही हातात डम्बेल्स घ्या. पाय जमिनीवर टेकवून गुडघे वर उचला. पाय मागे नितंबांपर्यंत येऊ द्या. डम्बेल्स धरलेले हात एकत्र आणा. हात कोपरापासून वाकलेले असू द्या. ही क्रिया पुन्हा 10 ते 12 वेळा करा.
5 जमिनीवर झोपा. डोक्याखाली उशी घ्या. दोन्ही हातात डम्बेल्स असू द्यात. पाय जमिनीवर टेकवून गुडघे वर उचला. डम्बेल्स धरलेले हात एकत्र आणा. डम्बेल्स एकमेकांना जोडू द्या. जोडलेले हे हात वर उचला. मग खाली आणा. ही क्रिया पुन्हा 10 ते 12 वेळा करा.