- सदानंद कदम
मी शिक्षक होते. आता निवृत्त. सेवेत असताना या संग्रहाचा खूप उपयोग व्हायचा वर्गात शिकवताना. आता असे विषयवार गठ्ठे बांधून ठेवलेत. ज्यांना हवेत त्यांनी न्यावेत. काम झालं की परत आणून द्यावेत.
सांगलीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाची स्मरणिका आणि त्या अनुषंगानं प्रकाशित करावयाच्या काही पुस्तिका यांचं संपादन करण्याच्या कामात मी सहभागी होतो. त्या पूर्वीची संमेलनं आणि त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांमधील उतार्यांची एक पुस्तिका काढायची होती. त्यासाठी जुन्या कागदपत्रांचा पसारा मांडला होता. माध्यमांमधूनही तसं आवाहन करण्यात आलं होतं. ते वाचून एक आजी भेटायला आल्या होत्या.
ऐंशी ओलांडून गेलेल्या त्या आजी. किरकोळ देहयष्टीच्या. गोर्यापान. सुती पातळातल्या. हातात एक कापडी पिशवी. त्यात कोंबून भरलेली वृत्तपत्रांची कात्रणं. या आजींनी पिशवीतून काय आणलं असावं या विचारात पडलेला मी.
आजींनी बैठक मारली आणि पोतडीतली कात्रणं बाहेर काढून माझ्यासमोर ठेवत त्या म्हणाल्या, “ही गेल्या पन्नास वर्षांतली कात्रणं. त्या त्या वेळच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वृत्तांत यात छापून आलेत. ही कात्रणं ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे तुमचं काम झालं की मलाच परत द्या.” - पन्नास वर्षांचा रोजचा उद्योग
मी ते घबाड लगेच ताब्यात घेतलं. आजींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांना निरोप दिला. ज्या वयात हरिकीर्तन करत किंवा दूरदर्शनवरच्या धार्मिक मालिका पाहत घरी बसायचं, त्या वयात आजी कात्रणांचं हे बाड घेऊन दोन किलोमीटर चालत आल्या होत्या आणि त्या चालत गेल्याही. तेव्हाच ठरवलं आजींच्या घरी जायचंच.
दोन दिवसांनी मी आजींच्या घरी. आजी बाहेरच्या खोलीत कातरी, पुठ्ठे घेऊन बसलेल्या. भोवती मराठी-इंग्रजीमधली अनेक दैनिकं. माझं कुतूहल वाढलेलं.
“काय करताय?”
माझं स्वागत करून मला बसायला खुर्ची देत त्या म्हणाल्या, “अहो, वेगवेगळ्या विषयांवरची कात्रणं काढून ती पुठ्ठ्यावर डकवतेय. विषयवार गठ्ठे तयार करत बसलेय. गेल्या पन्नास वर्षांचा हा रोजचा उद्योग.”
“आणि अशा पुठ्ठ्यांचं काय करता? काय उपयोग?”
“मी शिक्षक होते. आता निवृत्त. सेवेत असताना या संग्रहाचा खूप उपयोग व्हायचा वर्गात शिकवताना. आता असे विषयवार गठ्ठे बांधून ठेवलेत. ज्यांना हवेत त्यांनी न्यावेत. काम झालं की परत आणून द्यावेत.” - संदर्भ ग्रंथालय
मी गठ्ठे पाहूनच हबकलो. जवळपास वीस-पंचवीस विषयांवरची ती कात्रणं. हजारावर पुठ्ठे. त्यावर ती कात्रणं चिकटवलेली. लहान मुलांच्या चित्रांपासून, मोठमोठ्या इमारतींच्या चित्रांपर्यंत आणि भाषा-कला-साहित्य पर्यावरणापासून सर्व विषयांवरचे लेख. पुठ्ठेही एकाच प्रकारचे, नीट कापलेले. कपाटांतही असेच पुठ्ठे ठेवलेले. प्रत्येक कप्प्यावर आत कुठला विषय आहे, त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या लावलेल्या. स्टीलची सहा फूट उंचीची तीन कपाटं भरलेली. एरवी साड्यानं कपाटं भरतात बायकांची हे बघण्याची सवय. मला एखाद्या संदर्भ ग्रंथालयात गेल्यासारखंच वाटत होतं.
“पुठ्ठे एकसारखे कसे? कुठून आणता?”
“प्रेसमधून विकत आणते.”
“हा खर्च कशासाठी?”
केवळ स्वानंदासाठी!
“अहो, मुलींच्या हातात हे पुठ्ठे पडले की त्यांच्या डोळ्यांतल्या बाहुल्या नाचू लागतात. त्यांचा अवघा देह शिकण्यातला आनंद घेताना दिसतो. जाणवतं आपल्याला ते. माझ्या दृष्टीनं तो आनंद महत्त्वाचा. माझी ऊर्जा वाढविणारा. मुली अशा बहरताना पाहणं यासारखं सुख नाही.”
कधीकाळी प्रबोधनाचं काम करणारी वृत्तपत्रं हल्ली ’कूपन संकलन स्पर्धा’ घेतात. पोळपाट-लाटण्यापासून कुकर पर्यंतची बक्षीसं जाहीर करतात. ती मिळवण्यासाठी अनेकांची धडपड. घरी वृत्तपत्र न घेता शाळेतल्या दैनिकांतली कूपनं कापून नेणार्या माझ्या शिक्षक भगिनी माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. घरी एकही दैनिक न घेणारे शिक्षक बांधव माझ्याभोवती फेर धरून उभे राहिले. अशांना या बाई समजतील? त्यांच्या दृष्टीनं या वेड्याच की. पण या बाईंनी हा वेडेपणा सेवेत असतानाच केला नव्हता, तर निवृत्तीनंतर पंचवीस वर्षं होत आली तरी सुरू ठेवला होता. इतर शिक्षकांना मदत व्हावी म्हणून. पदरचा पैसा खर्च करत. घरी दैनिकांचा रतीब लावत. आजही त्यांचा हा वेडेपणा तसूभरही कमी झालेला नाही. बाई दिवसभर हेच करत असतात.
- केवळ स्वानंदासाठी. हे कामच आज त्यांना जगवतं.
न डगमगता परकी भाषा आत्मसात बाई एकट्या. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यानं विजापूरपासून पुण्यापर्यंत शिक्षण घेतलेल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून सत्तेचाळीसला गणित विषय घेऊन बी. ए. झालेल्या. पण त्यांना शिकवावं लागलं ते इंग्रजी. ज्याला ज्या विषयाची आवड तो विषय त्याला न देण्याची शाळांची अशी परंपरा आजही अबाधित. पण बाईंनी न डगमगता ती परकी भाषा आत्मसात केली. तिच्यावर मातृभाषेइतकंच प्रभुत्व मिळवलं आणि आपल्या विद्यार्थिनींनाही ती भाषा त्यांच्या मातृभाषेइतकीच सोपी वाटावी असं अध्यापन केलं. त्यासाठी अपार मेहनत घेतली.
“इंग्रजीवर इतकं कसं तुमचं प्रभुत्व?”, असं विचारताच त्या म्हणाल्या, “अहो, प्रयत्न केला तर कुठलीच भाषा अवघड नाही. हाताशी उत्तम शब्दकोश आणि इनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे दहा खंड एवढ्या शिदोरीवर मला सगळं जमून गेलं.”
“शब्दकोशांचं मी समजू शकतो, पण ब्रिटानिकाचे खंड?”
हातात ’मार्गदर्शक’ घेतल्याशिवाय इंग्रजीच्या तासाला वर्गात पाऊलही न टाकणारे माझे बांधव मला दिसू लागले. इंग्रजी शिकवणारे. ज्यांना मराठीही ’नीट’ लिहिता येत नाही असे. बहुतेकांचे पदवीचे विषय इंग्रजी सोडून बाकीचे. यातले फार म्हणजे फारच थोडे इंग्रजी नीट बोलणारे.
पाठ नीट समजावून देण्यासाठी हे खंड खूप उपयुक्त. पाठात आलेल्या शब्द, कल्पना समजावून देताना यातली माहिती उपयोगाला येते. ती शोधून, त्या त्या पाठाच्या अनुषंगानं सांगितली तर मुलांना जादा माहितीही मिळते आणि त्यांची भाषाही सुधारते. विषयाची गोडी लागते त्यांना. त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच. तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?
काय बोलावं हे न सुचल्यानं मी शांत. मला माझे बांधव दिसू लागले होते. दुसरी-तिसरीच्या पाठ्यपुस्तकातले मराठी शब्दही योग्य तर्हेनं न लिहिणारे. तरीही प्रसवोत्सुक. रोज नवं नवं साहित्य जन्माला घालण्याची घाई झालेले. त्यासाठी ’कळा’ही न सोसणारे. ’अभिनंदन’ कधी करावं आणि ’शुभेच्छा’ कधी द्याव्यात हेसुद्धा न कळणारे. अशी माणसं जर ’मराठीचे अध्यापक’ म्हणून मिरवत असतील तर ते इंग्रजीचं काय करत असतील? घरात एकही शब्दकोश न ठेवणार्या अशा माणसांना इनसायक्लोपिडियाचे सगळे खंड उशाशी ठेवणार्या या बाई समजणार तरी कशा? बरं त्या काही महाविद्यालयात शिकवत नव्हत्या. त्या शिकवत होत्या माध्यमिक शाळेत. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या मुली आज आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचे मळे फुलवत आहेत यात नवल काय? - सगळे विषय एकमेकांच्या मदतीनं शिकवले…
“अहो हे शब्दकोश, हे खंड जसे मला उपयोगी पडत होते, तसे नकाशे आणि माझे हे कात्रण-पुठ्ठेही.”
“तुम्ही गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर अध्यापन केलं ते इंग्रजीचं. मग नकाशाचा संबंध आला तरी कुठे?”
“आपण विषय असे तोडतो हेच चुकतं. सगळे विषय एकमेकांच्या मदतीनं शिकवले तर विद्यार्थ्यांच्या गळी चांगले उतरतात, हा माझा अनुभव.”
“पण नकाशा?”
“तुम्हाला मी उदाहरणच देते. तेव्हा दहावीला एक कविता होती फ्लॉरेन्स नाइटिंगेलवरची. ’लेडी विथ द लॅम्प’. ही बाई परिचारिका, लेखिका आणि संख्याशास्त्रज्ञ. 1853च्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची शुश्रूषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना ’लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनच जग ओळखू लागलं. आता हे सारं मुलींना समजावून द्यायचं तर ते युद्ध, ती युद्धभूमी दाखवायला नको का? नुसते कवितेतल्या शब्दांचे अर्थ सांगून कुठं कविता समजते का? तेव्हा मला हे खंड आणि नकाशा उपयोगाला आले. दोन दिवस नकाशा वर्गात टांगून मी आधी ते युद्ध समजावून दिलं आणि मग ती कविता. तेव्हा कुठं ती फ्लॉरेन्स माझ्या मुलींच्या काळजात उतरली. कविता जर काळजात उतरली नाही तर मग काय उपयोग?”
काय बोलणार यावर? आमच्या भूगोलाच्या मंडळींनीही नकाशाला हात न लावण्याची शपथ घेतलेली. तिथं या बाई इंग्रजीच्या तासाला नकाशा वापरत होत्या. अशा बाई आम्हाला लाभल्या असत्या तर आमचं इंग्रजी निदान ’बरं’ झालं असतं असं मला राहून राहून वाटत होतं. - पैसे कमावण्याची हौस नव्हतीच
पण तुम्ही तर गणिताच्या पदवीधर. आयुष्यभर शिकवलं इंग्रजी. मग गणिताचं काय झालं? तुमची गणिताची आवड?
ती आवड मला स्वस्थ बसू देते थोडीच? इंग्रजी मला शिकवावी लागली म्हणून मी शिकले. सर्वस्व पणाला लावून त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. पण माझा जीव गणितातच अडकलेला. मग मी अकरावी, बारावीच्या मुलांसाठी गणिताचे वर्ग घेऊ लागले. पैसे कमावण्याची हौस नव्हतीच. माझा पगार मला नियमित मिळत होता. पुरेसा होता. हे वर्ग घेतले ते केवळ माझ्या हौसेसाठी. गणिताची नाळ टिकून राहावी म्हणून.
पुन्हा माझ्याभोवती माझेच बांधव. खाजगी शिष्यवृत्ती परीक्षांना सक्तीनं मुलं बसवून पालकांकडून फी आणि परीक्षा घेणार्यांकडून कमिशन घेणारे. परीक्षार्थींच्या संख्येच्या प्रमाणात आधीच निकाल वाटून घेणारे. दोन-चार जिल्ह्यांत घेतल्या जाणार्या या परीक्षेतील आधीच ठरलेल्या निकालाचे फलक मात्र ’जिल्ह्यात… राज्यात… देशात पहिला’ असे. तेही चौकाचौकांत लावणारे. यांना बाई समजतील? गंमत म्हणजे हे ’जिल्ह्यात… राज्यात पहिले’ शासकीय शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत का चमकत नाहीत, हे कोडं न सुटणारं.
बाईंचं आजचं वय 95. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा कात्रण-गठ्ठ्यांचा उद्योग नियमित सुरू होता. आता त्या थकल्या असल्या तरी अजूनही तितक्याच उत्साहानं ’शिकणं आणि शिकवणं’ यावर बोलत असतात आणि फक्त यावरच बोलत असतात. गुढीपाडव्यादिवशी बर्याच दिवसांनी त्यांच्याशी गप्पा झाल्या. दुसरा विषय त्यांच्या बोलण्यात आलाच नाही. मी अजूनही त्यांच्यातला ’शिक्षक’ समजून घेण्याच्या प्रयत्नात. सहज विचारलं परवा त्यांना.
“एकटं राहण्याचा त्रास नाही झाला? शाळेत… समाजात?”
“आपण आपल्या कामात व्यग्र आणि विचारांवर ठाम असलो की कुणी नादाला लागतच नाही. त्यातूनही कुणी लागलं तर आपली इवलीशी तर्जनीसुद्धा कामी येते.”
“म्हणजे? मी नाही समजलो.”
“सांगते. वार्षिक तपासणी सुरू होती. विस्तार अधिकार्यांसोबत उपशिक्षणाधिकारीही आलेले. त्यांनी माझं इंग्रजी शिकवणं पाहिलं. त्यांना ते आवडलंही. चहापानावेळच्या शिक्षकांच्या बैठकीत त्यांनी माझं कौतुकही केलं त्याबद्दल. आणि नको तो प्रश्न विचारला. म्हणाले, ’बाई तुम्ही लग्न का नाही केलंत?’
त्यांच्या मनात काही नसेलही, त्यांचा हेतूही चांगला असेल. पण मला ते खटकलं. त्यांच्याकडं तर्जनी रोखत मी म्हटलं, ’इटस् नन ऑफ युवर बिझनेस सर’. आणि बैठकीतून बाहेर पडले. अशी गंमत.”
बाईंच्या हसर्या चेहर्यावर खट्याळपणाची एक हलकी रेषा. - या बाईंचं पाणीच वेगळं
बाई हे ठामपणे बोलू शकल्या कारण त्यांना कसलाही मोह नव्हता. ना कुठल्या पुरस्काराचा, ना ’अत्युत्कृष्ट’ शेर्याचा. अशा शेर्यासाठी नळावरच्या भांडणासारखं वचावचा भांडणार्या मला नव्या नव्हत्या. पण या बाईंचं पाणी वेगळंच होतं. त्यांनी रोखलेली ’ती’ तर्जनी ताठ होती ती त्याच पाण्यामुळं. त्यांच्या चोख कामामुळं. त्याच बळावर त्यांची सारी वाटचाल दिमाखात झाली. त्यांचा हाच बाणेदारपणा सोबत घेऊन त्यांच्या अनेक मुलींची वाटचाल सुरू आहे, तशाच दिमाखात.
धवल चारित्र्य, निष्कलंक हात, आपलं काम उत्तमच व्हायला हवं याचा ध्यास आणि विद्यार्थ्यांविषयीची तळमळ या शिदोरीवर सांगलीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेत सुमती बाबुराव फडकेबाईंनी आपला कार्यकाळ गाजवला. यथावकाश त्या निवृत्त झाल्या तरी त्यांच्या मुलींच्या काळजात त्यांचं स्थान आजही कायम आहे. ते कायम राहील यात कसलीच शंका नाही.
कारण काळजात जागा मिळते ती आयुष्य प्रकाशमान करणार्या दिव्यांनाच. मेणबत्त्या काय घरभर असतातच.
Link Copied