मुलांच्या शाळा सुरु झाल्या म्हणजे रोज त्यांना डब्यामध्ये काय द्यायचं हा प्रश्न पडतो. त्यासाठी आज आपण मुलांच्या आवडीचा व सकाळी झटपट बनणारा पदार्थ पाहूयात.
शिऱ्याची पोळी
साहित्य : पारीसाठी : एक वाटी बारीक दळलेली कणीक, अर्धी वाटी मैदा, तेल.
सारणासाठी : एक लहान वाटी बारीक रवा, एक वाटी साखर, एक वाटी तूप, एक टी स्पून वेलची पूड, केशरकाड्या , दूध.
कृती : कणीक व मैदा एकत्र करून त्यात थोडं तेल घालावं. घट्टसर भिजवून घ्यावं. नंतर तेल व पाणी घालत सैलसर कणीक भिजवून ( पुरणपोळीसाठीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट असावी ). कणीक झाकून ठेवावी.
रवा आधी नुसताच भाजून घ्यावा. नंतर तुपावर परतून दूध किंवा पाणी घालून ढवळावा व झाकण ठेवावं. रवा शिजल्यावर साखर घालून ढवळावा व झाकण ठेवावं. साखर विरघळल्यावर वेलची पूड व केशराच्या काड्या घालून पुन्हा ढवळावं. शिरा नेहमीपेक्षा किंचित कोरडा बनायला हवा. शिरा थंड होऊ द्यावा. पोळी करण्यासाठी कणकेचा उंडा घ्यावा. शिऱ्याचा दुप्पट गोळा घेऊन उंड्यात घालावा. तांदूळपिठी किंवा मैद्यावर उंडा ठेवून अलगद पोळी लाटावी व तुपावर भाजून घ्यावी. अशाच प्रकारे गुळाच्या, रताळ्याच्या, गाजराच्या, खव्याच्या अशा विविध पोळ्या बनवता येतील.