दिवाळी जवळ आली आहे. करोनाचे सावट बरेचसे दूर झाले आहे. मनावर आलेली मरगळ झटकून आपल्या घराकडे लक्ष देण्याकडे बहुतेक जणांचा कल आहे.
साधारणपणे दिवाळी आधी किंवा लग्नकार्याच्या निमित्ताने घराची रंगरंगोटी करण्याची आपली प्रथा आहे. पण आता वेळ कमी उरला आहे. तेव्हा रंगकामाचा रगाडा उपसण्याऐवजी वॉल पेपर्सच्या मदतीने आपल्या घरास रंगवा.
वेगवेगळ्या कंपन्यांचे, अतिशय आकर्षक रंगसंगती व डिझाइन्सचे वॉल पेपर्स मिळतात. ते लावणारे कारागीर झटपट लावून देतात. घराला रंग लावायचा तर महिन्याभराची फुरसत असते. पण हे वॉल पेपर्स अक्षरशः २-३ दिवसात लावून होतात.
तेव्हा घराची शोभा वाढविण्यासाठी रंगीबेरंगी वॉल पेपर्स हा उत्तम पर्याय आहे. वेळ व खर्चाची बचत करणारे व अगणित डिझाइन्सच्या वॉल पेपर्सनी तुमचे घर रंगवू शकता.
पेन्टिंगचा लूक देणारे थ्री डी वॉलपेपर्स मिळतात. त्याचप्रमाणे निसर्गचित्रे, अवकाश चित्रे, फुले, विविध देखावे अशा डिझाइन्सचे वॉल पेपर्स मिळतात. शिवाय मॉडर्न पेन्टिंग किंवा ॲबस्ट्रॅक्ट पेन्टिंगचे वॉल पेपर्स मिळतात.
दिवाणखाना, बेडरूम यांचा मूड साधणारे पेपर्स तुमचे घर अधिकच सुशोभित करतील.