बांगडी म्हणजे अती प्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा एक अलंकार. जुन्या संस्कृत ग्रंथात वलय, कंकण, चुडा, कटक, आवापक, परिहार्य अशी नावे त्याला दिलेली आढळतात.
'पहिले कंगण सौभाग्याचे भूषण', असा मंत्र नवविवाहितेला तिची पाठवणी करताना दिला जातो. "कंकण' हे सौभाग्याचे भूषण मानले जाते.
लग्नाच्या वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घातल्या जातात त्यांना वज्रचुडा म्हणतात. हा सौभाग्य अलंकार मानला जातो. हा चुडा हिरव्या रंगाचा असतो. काही ठिकाणी तो लाल रंगाचा असतो.
सवाष्ण बायकांच्या जीवनात बांगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सौभाग्यवती बाईने रिकाम्या हातांनी कधीच राहू नये, असे जुने जाणते लोक सांगतात.
पूर्वी बांगड्या भरण्यासाठी घरी कासाराला बोलावले जायचे. एका विशिष्ट प्रकारच्या टोपलीत बांगड्यांची बंडले बांधून कासार घरी जायचे आणि महिलांच्या हातात बांगड्या भरायचे.
हात भरून बांगड्या भरणे ही त्यावेळी महिलांसाठी अभिमानाची बाब होती. लग्न-कार्याबरोबरच संक्रांत, नागपंचमी, हरतालिका, गौरी-गणपती, दसरा, दिवाळी या सणांना प्रामुख्याने बांगड्या भरल्या जायच्या.
ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो, त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहते अशी आख्यायिका आहे.
बांगडी हा हातात घालण्याचा अलंकार. परंतु, आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांचे महिलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शरीरावर धारण केलेल्या धातूंच्या आभूषणांमधून सतत एक ऊर्जा मिळत असते. जी आपली प्रतिकारशक्ती वाढविते. सोबत आत्मिक बळही देते. महिलांना शक्ती देण्याचे महत्त्वाचे काम या सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधून व्हायचे.
आपल्या बाल्कनीत लटकवलेल्या वाइंड चाइम्सची किणकिण जशी सुखावह वाटते अगदी तशीच स्त्रीच्या हातातील बांगड्यांची झालेली किणकिण मन शांत करते, असे ध्वनिशास्त्र व मानसशास्त्र सांगते.
स्त्री सतत कामात असते. मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू ह्यांना हातातील बांगड्यांमुळे ॲक्युप्रेशर मिळाले तर बाई कमी कंटाळते, तिचा शीण कमी होतो.
स्त्री सतत अग्नीच्या संपर्कात असते. अन्न शिजवताना निर्माण होणारी धग व उष्णता तिच्या हातातील काचेच्या बांगड्यामुळे शोषून घेतली जाते. त्यामुळे तिला कोणताही अपाय होत नाही. असाच अनुभव उन्हात बाहेर गेल्यानंतर आपल्याला येतो. उन्हाचा दाह बांगड्या शोषून घेतात.
हातावर पट्कन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा आपल्यावर घेतात.
तोतरेपणा, बोबडेपणा, जड जीभ तसेच इतर आरोग्यावरही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो.
बांगड्यांच्या विश्वात काचेचे स्थान उच्चतम आहे. उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद हे काचेच्या बांगड्यांचे सर्वात महत्त्वाचे व मोठे केंद्र आहे. तसेच हैद्राबादमध्ये फक्त बांगड्यासाठी प्रसिद्ध असलेला चुडीबाजार आहे.
सुमारे ५० वर्षांपूर्वी बांगड्यांची क्रेझ काही निराळीच होती. पण जसजसे २१वे शतक जवळ येऊ लागले तसतसे बांगड्या घालण्याला संस्काराचे नव्हे तर, फॅशनचे स्वरूप प्राप्त झाले.
संस्कृतीचे प्रतीक असणारी बांगडी आता फॅशनचे प्रतीक झाली आहे. महिलांमधला मोठा वर्ग फॅशनेबल बांगड्यांकडे वळला आहे.
जसा वेष, तशा बांगड्या, असे चित्र आता निर्माण झाले आहे. साडी किंवा ड्रेसला मॅचिंग होतील अशा पद्धतीने बांगड्यांची खरेदी करण्याकडे महिलांचा ट्रेंड वाढू लागला आहे.
आपल्या सर्वांच्या मनावर हा सतत आघात केला गेला आहे की, आपल्या संस्कृतीत स्त्रीला महत्त्व नाही. परंतु, हे सर्व जाणून घेतल्यावर आपलं लक्षात येईल की, जितकी काळजी आपल्या संस्कृतीने स्त्रीची घेतली आहे तितकी कुठेही इतरत्र दिसत नाही.
आपल्या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचे महत्त्व ओळखून आपण त्या जतन केल्या पाहिजेत, तरच त्या आपण पुढच्या पिढीला देऊ शकू.