तिळ-गूळ घ्या, गोड गोड बोला; असं सांगणारी मकर संक्रांत आली आहे. संक्रांती निमित्त तिळाच्या या काही वेगळ्या पाककृती...
तिळाचे लाडू
साहित्यः अर्धा किलो तीळ, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, 1 ते दिड वाटी शेंगदाणचे कूट,1 चमचा वेलची पूड, 1 ते 2 चमचे तूप.
कृतीः प्रथम तीळ मंद आचेवर व्वस्थित भाजून घवेत. नंतर गॅसवर कढई किंवा मोठं भांड ठेवावं त्यात चिक्कीचा गूळ आणि तूप घालावं. गुळाचा गोळीबंद पाक तार करून घवा. पाक करताना तो सतत ठवळत राहावं. पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाणचा कूट, वेलची पूड घालून मिक्स करून घवं. तनंतर लगेचच लाडू वळायला घ्या. लाडू वळताना हाताला तूप लावल्यास लाडू सहज वळले जातील व हाताला चिकटणार देखील नाहीत.
मल्टीग्रेन लाडू
साहित्यः अर्धा कप बाजरीचं पीठ, अर्धा कप नाचणी पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ,1 टेबलस्पून काजू, 2 टेबलस्पून अळशी किंवा सफेद तीळ (भाजून घेतलेले), सव्वा कप गूळ (किसून घेतलेला), 1 टेबलस्पून तूप, अर्धा टीस्पून वेलची पूड.
कृतीः एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात सर्व पीठे मंद आचेवर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. पीठ परतून झाल्यानंतर आचेवरून उतरवा आणि एका बाजूला ठेवा.त्याच कढईमध्ये किसलेला गूळ आणि पाव कप पाणी घालून गूळ विरघळवून घ्या. गूळ विरघळल्यानंतर गाळणीतून गाळून घ्या. गुळाचा पाक बनविण्याकरीता गुळाचं पाणी कढईमध्ये घेऊन उकळवा. एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यात अर्धा टीस्पून गुळाचा पाक घाला. त्याचा मऊ गोळा झाला तर पाक व्यवस्थित झाला असे समजावे. ते आचेवरून खाली उतरवा. त्यात भाजून घेतलेली वेगवेगळी पीठे हळूहळू एकत्र करा. त्याच्या गुठळ्या होता कामा नये. त्यात अळशी किंवा भाजलेले तीळ आणि वेलची पूड घालून त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळा.
लक्षात ठेवा
गूळ खाताना काही वेळा त्यात दगड लागतात. गुळाचं पाणी बनविल्यानंतर आधी ते गाळून घ्या. त्यामुळे लाडू खाताना मधमधे चरचरीत लागणार नाही.
चॉकलेट तिळाचे लाडू
साहित्य: पाऊण कप सफेद तीळ, 1 कप डार्क चॉकलेट पावडर, अर्धा कप खोबरं किसलेलं, पाव कप बेसन (भाजून घेतलेलं), पाव कप शेंगदाणे (भाजून जाडसर वाटून घेतलेले), अर्धा कप किसलेला गूळ, 1 टेबलस्पून तूप, चिमुटभर वेलची पूड.
कृतीः एका पॅनमध्ये तीळ सोनेरी होईपर्यंत भाजून मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या. नंतर त्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ विरघळवून घ्या. आचेवरून खाली घ्या. त्यात किसलेलं खोबरं, वेलची पावडर, भाजलेलं बेसन, शेंगदाण्याचा कुट, तीळ पावडर आणि डार्क चॉकलेट घालून व्यवस्थित एकत्र करा. हातांना तेल लावून घ्या. नंतर मध्यम आकाराचे बॉल्स बनवा.
तिळ-शेंगदाणे-खजूर रोल्स
साहित्यः 250 ग्रॅम खजूर (बी काढलेले), 50 ग्रॅम सफेद तिळ, 100 ग्रॅम शेंगदाणे (भाजून कुट करून घ्या), 2 टेबलस्पून साजूक तूप
कृतीः खजूर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. एका पॅनमध्ये सफेद तिळ चांगले परतवून घ्या. आता पॅनमध्ये 1 टीस्पून तूप गरम करून त्यात खजूराची पेस्ट घाला आणि 5 मिनिटं परतवा. मग शेंगदाण्याचा कुट घालून चांगले मिक्स करा. नंतर आचेवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. हातांना तेल लावून मध्यम आकाराचे रोल बनवा. रोल सेट होण्याकरिता 30 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजमधून काढून रोलचे स्लाइस कापून 10 मिनिटांनी सर्व्ह करा.
तिळ गुळाचा पराठा
साहित्यः 2 टेबलस्पून सफेद तिळ, अर्धा कप गूळ (बारीक करून घ्या), दीड कप गव्हाचं पीठ, चिमुटभर मीठ, 3 टेबलस्पून कोमट साजूक तूप
कृतीः एका पॅनमध्ये गूळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून गरम करा. गूळ विरघळल्यानंतर आचेवरून उतरवा. नंतर पॅनमध्ये तिळ सोनरी रंग येईपर्यंत परतून वेगळे बाजूला ठेवा. गव्हाच्या पीठामध्ये 2 टेबलस्पून तूप, मीठ आणि भाजलेले तिळ घालून चांगलं मिक्स करा. त्यात गूळाचं पाणी घालून नरम पीठ मळून घ्या. पीठाचा गोळा घेऊन घडीच्या पोळीसारखा लाटा. मग नॉनस्टिकच्या तव्यावर पराठा दोन्ही बाजूला तूप लावून खरपूस भाजून घ्या.
तिळ आणि सूजी कतली
साहित्यः 1 कप सूजी, 1 कप साखर, 1 कप सफेद तिळ, अर्धा कप तूप, अर्धा कप बदाम (काप केलेले), अर्धा टीस्पून वेलची पावडर, 1 कप पाणी
कृतीः पॅनमध्ये तिळ घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. दुसर्या पॅनमध्ये तूप गरम करून मंद आचेवर सूजी खरपूस भाजून घ्या. नंतर एका भांड्यामध्ये साखर आणि आवश्यक इतके पाणी घेऊन 1 तारी पाक बनवा. त्यात भाजलेली सूजी, तिळ आणि बदाम घालून चांगलं मिक्स करून घ्या. नंतर त्यात वेलची पावडर घाला. आचेवरून उतरवून तेल लावलेल्या पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण पसरवा. अर्ध्या तासानंतर त्याचे डायमंडच्या आकारात तुकडे कापा आणि सर्व्ह करा.