Close

शीत ऋतूत काय खावे? (What to eat in winter?)

जे खाऊ ते पोषण करणारे, या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ या ऋतूत जरूर खावेत.

हिवाळा म्हणजे आरोग्यात वृद्धी आणि शरीरास पुष्टी देणारा ऋतू. असे म्हणतात की, शीत ऋतूत खाल्लेले अंगी लागते आणि ते संपूर्ण वर्षभर आपल्याला भरपूर जीवनसत्वांचे पोषण देते. म्हणूनच थंडी आली की आपण आपल्या आहाराबाबत विशेष जागरूक असतो, म्हणजे असायलाच पाहिजे. ऋतूंमध्ये बदल होणं हे आपल्या हातात नाही, पण बदललेल्या ऋतूमुळे आपलं आरोग्य राखलं जावं, ते बिघडू नये हे मात्र आपल्या हातात आहे. त्यासाठी तिन्ही ऋतूंमध्ये आपल्याला आहार-विहार व विचारांमध्ये बदल करणं तेवढंच आवश्यक आहे.

त्यात सर्व ऋतूंमध्ये थंडीचा एकच असा ऋतू आहे की यात आपण आपले आरोग्य  प्रकृतीकडून नैसर्गिकरित्या सुधारू शकतो. हिवाळ्यात शरीरातील अग्नी प्रदीप्त असल्यामुळे खूप पथ्ये नसतात. या ऋतूत काय खावे याचे काही साधे निकष सांगता येतील. जे खाऊ ते पोषण करणारे, या ऋतूत होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ हिवाळ्यात जरूर खावेत. ह्या ऋतूमध्ये उष्मा हा बाहेरच्या शीत वातावरणामुळे शरीरातच राहतो आणि प्रबळ होतो. त्यामुळे जठराग्नी अजून बलवान होतो त्यामुळे पचनशक्ती उत्तम असते आणि पौष्टिक जड स्निग्ध पदार्थ देखील सहज पचन होतात. म्हणूनच शीत प्रदेशातील लोक तुलनेत जास्त निरोगी असतात. आपल्याकडे हा ऋतू फारच थोडा असतो तेव्हा ह्याचा उपयोग आपण आरोग्यासाठी करून घ्यायलाच हवा.

हिवाळ्यात आहारामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा वापर वाढवायला हवा. मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. खाद्यपदार्थ बनवताना हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्याच्या पदार्थांची व्यवस्थित योजना केली, तर ते रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.

नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचं सेवन करायचंच; मात्र, साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचं प्रमाण वाढवता येतं. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. पराठे- थालिपीठही खावेत. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.

हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.  

दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.

कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.

भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, पडवळ, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात. 

बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही उष्मांकवर्धक असतो. या शीत ऋतूमध्ये गाईच्या दुधापासून काढलेले तूप नित्य आहारात असावे.

या व्यतिरिक्त विशेष व्यायाम प्राणायाम आणि आठवड्यातून किमान एकदा तिळाच्या तेलाने सर्वांगास मालिश करावी.

खरं तर मानवी शरीरात अशी काही किमया असते की कुठल्याही ऋतूत आरोग्याशी तडजोड करण्याची क्षमता त्यात असते किंवा ऋतुमानानुसार खाण्याचे भारतीय संस्कार आणि मोसमी फळे भाज्या ह्यामुळेही स्वास्थ्य उत्तम राहते.

Share this article