हॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता हॅरिसन फोर्ड याची भूमिका असलेला 'इंडियाना जोन्स ॲन्ड द डायल ऑफ डेस्टिनी' हा चित्रपट याच महिन्यात इंग्रजीसह हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होत आहे. साहसी चित्रपटांच्या जगात 'इंडियाना जोन्स' ची मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्याचा प्रभाव भारतीय कलाकारांवर दिसून येतो.
अनिल कपूर
'मिस्टर इंडिया' या गाजलेल्या चित्रपटात अनिल कपूरचा पोशाख, इंडियानाने घातलेल्या पौराणिक पोशाखाची आठवण करून देतो. साधा तपकिरी कोट आणि आयकॉनिक टोपी घालून अनिल त्यात वावरला होता. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे होते, तरी पण अनिलचा पोशाख मात्र इंडियानाचा होता.
अमरीश पुरी
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी इंडियाना जोन्स पासून प्रेरित होते. ते तशा पद्धतीचा पोशाख मिरवित असत. इतकेच नव्हे तर 'इंडियाना जोन्स ॲन्ड द टेम्पल ऑफ डूम' या चित्रपटात मोलारामची भूमिका त्यांनी केली होती.
रणवीर सिंग
रणवीर सिंग नेहमीच धमाल आणि अचाट पेहराव करतो. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या विमानतळावर त्याने आयकॉनिक इंडी हॅट आणि आधुनिक टच असलेल्या इंडियाना जोन्सच्या पोशाखात चाहत्यांना दर्शन दिले होते. गेल्याच वर्षी त्याने 'द टेम्पल ऑफ डूम' मधील मोला रामचे कपडे घालून सोशल मिडियावर आपला फोटो प्रसिद्ध केला होता.
राणा दग्गुबती
बाहुबली फेम राणा दग्गुबतीने, आपल्या कारकिर्दीला आकार देणाऱ्या काही चित्रपटांचा आढावा एका मुलाखतीत घेतला होता. त्यामध्ये त्याने 'द लॉस्ट आर्क'च्या इंडियाना रेड जोन्सने मोलाची भूमिका बजावली असल्याचा उल्लेख केला होता.
महेश बाबू
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला इंडियाना जोन्सची भुरळ पडलेली दिसते. पाठीवर बाण असलेले स्टायलिश लेदर जॅकेट घालून आपल्या आगामी 'एसएसएमबी २९' या चित्रपटात क्लासिक इंडियाना जोन्सच्या लुकमध्ये नवीन ट्विस्ट आणण्यासाठी तो सज्ज झालेला दिसतो.