'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सध्या सतत चर्चेत आहे. ज्या कलाकारांमुळे या मालिकेचे इतके नाव झाले आता तेच या मालिकेबद्दलची गुपिते सर्वांसमोर आणत आहेत. आधी शैलेश लोढा आणि नंतर जेनिफर मिस्त्री यांनी असित मोदींवर आरोप केले. यानंतर हळूहळू आणखी सहकलाकार यात सहभागी झाले. त्यात बावरीचेही नाव होते, ही भूमिका मोनिका भदौरिया साकारत होती. शोचे निर्माते असित मोदीबद्दल तिने बरेच काही सांगितले. शो दरम्यान तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, असे तिने आता म्हटले आहे. एवढेच नाही तर निर्मात्यांनी तिला तीन महिन्यांपासून सुमारे ४ ते ५ लाख रुपये दिले नसल्याचा आरोपही तिने यापूर्वी केला होता.
'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मोनिका भदौरियाने तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर तिने दिवस कसे घालवले याबद्दल सांगितले. तिने त्या दिवसांना नरकाची उपमा दिली. तिच्या आईवर कॅन्सरचे उपचार सुरू असतानाही निर्मात्यांनी साथ दिली नाही, असा दावाही तिने केला. ती म्हणाली होती, 'मी आज काम करण्याच्या स्थितीत नाही असे म्हटले तर ते तरीही मला यायला भाग पाडायचे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे शूटवर आल्यानंतरही मला वाट बघावी लागायची कारण तिथे गेल्यावर मला करण्यासारखे काहीच नसायचे.
निर्मात्यांच्या बोलण्याने मोनिका दुखावली
'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत मोनिका भदौरिया म्हणाली की, 'मला अनेक कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मी माझी आई आणि आजी दोघांना गमावले आहे. अगदी कमी काळाच्या अंतरात दोघीही मला सोडून गेल्या. दोघीही माझा आधार होत्या. त्यांनी माझी चांगली काळजी घेतली आहे. त्यांच्या जाण्याच्या दुःखातून मी सावरले नाही. माझे आयुष्य आता संपले असे मला वाटले. या काळात मी तारक मेहतामध्ये काम करत होते. तेही खूप त्रासदायक होते. या सर्व प्रकारामुळे आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊ लागला. त्यांनी (TMKOC चे निर्माते) सांगितले की जेव्हा तुझे वडील वारले तेव्हा आम्ही पैसे दिले. तुझ्या आजारी आईच्या उपचारासाठी आम्ही पैसे दिले. त्यांच्या या शब्दांनी मला खूप त्रास दिला.
मोनिकाला सेटवर आई-वडिलांना आणायचे होते
मोनिका भदौरिया पुढे म्हणाली की, सेटवर माझ्याशी ज्याप्रकारे वागले जात होते, त्यानंतर मी शो सोडण्याचा निर्णय घेतला होता. या शोच्या सेटवर आपल्या आई-वडिलांना आणण्याचे माझे स्वप्न होते. पण सेटवरचं वातावरण पाहून मी ठरवलं की मी त्यांना कधीही या सेटवर यायला सांगणार नाही. 'पण जेव्हा माझी आई आजारी होती, तिच्या शेवटच्या दिवसात होती, तेव्हा मला वाटलेले की तिला या सेटवर आणून मी कुठे काम करते ते दाखवावे पण ते अशक्य होते.'
मोनिकाने निर्मात्यांवर फसवणूक केल्याचा आरोप केला
मोनिका भदौरियाने सांगितले की, मालिकेच्या सेटवरील वातावरणामुळे तिला शो सोडण्यास भाग पाडले. सध्या जो कोणी या शोमध्ये काम करत आहे, तो केवळ पैशासाठी करतोय,. 'पैसा महत्वाचा आहे पण स्वाभिमानापेक्षा जास्त नाही.' मोनिकाने पुढे शोच्या निर्मात्यांना पैशासाठी कलाकारांची फसवणूक केल्याचा आणि करारातील गोष्टी स्पष्टपणे न सांगण्याचा आरोप केला आहे.