क्रीम, मॉइश्चरायझर आणि फेस मास्क… हे सर्व त्वचा सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी उपयोगात येणारे बाह्य उपाय आहेत. यांच्या बरोबरीनेच निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी काही जीवनसत्त्वे देखील आवश्यक आहेत. सौंदर्यासाठी जीवनसत्त्वे? असा प्रश्न पडलाय का? आपण लगेचच त्याचं निवारण करूया. जाणून घेऊया. त्वचेच्या आरोग्यासाठी कोणकोणती जीवनसत्त्वे आवश्यक असतात अन् ती कोणकोणत्या अन्नपदार्थांमधून मिळतात?
सुरकुत्यांसाठी ए जीवनसत्त्व
ए जीवनसत्त्वाच्या सेवनाने सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचेवरील काळे डागही कमी होतात. तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर करून ती मऊ होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ए चे स्त्रोत: हिरव्या पालेभाज्या, दूध, गाजर, भोपळा, अंडी इ.
डागांसाठी सी जीवनसत्त्व
सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे जे नुकसान होते त्यापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सी जीवनसत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे. या व्यतिरिक्त सी जीवनसत्त्वामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या निघून जातात. त्वचा सैल पडू देत नाही आणि वृद्धत्वासाठी जबाबदार मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सीचे स्त्रोत: ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, लिंबूवर्गीय फळे इ.
त्वचेची आर्द्रता राखण्यासाठी ई जीवनसत्त्व
त्वचेची नैसर्गिक आर्द्रता राखण्यासाठी आणि कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. हे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण देखील करते.
व्हिटॅमिन ईचे स्त्रोत: ऑलिव्ह, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या इ.
काळ्या वर्तुळांसाठी के जीवनसत्त्व
व्हिटॅमिन के डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेचा रंग खराब होण्यापासून आणि सुरकुत्या येण्यापासून संरक्षण करते.
व्हिटॅमिन केचे स्रोत - हिरव्या भाज्या, सोयाबीन, ब्रोकोली, कोबी इ.
निरोगी त्वचेसाठी जीवनसत्त्व बी (व्हिटॅमिन ए) कॉम्प्लेक्स
बी जीवनसत्त्वामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. बी कॉम्प्लेक्समध्ये आढळणारे बायोटिन हे पोषक तत्व केस आणि नखे देखील निरोगी बनवते. हे पेशींना हायड्रेट करते ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते.
व्हिटॅमिन बी चे स्त्रोत - दलिया, तांदूळ, अंडी, केळी इ.