भूक लागलीय आणि पटकन काहीतरी गरमागरम खायचंय, तर केवळ अंडं फोडण्याचा अवकाश... मीठ, तिखट, कांदा, टोमॅटो असं जे काही हाताशी मिळेल, ते त्यात मिसळून तव्यावर सोडलं की गरमागरम ऑम्लेट तयार! अशा या अल्टिमेट फास्ट फूड असणार्या ऑम्लेटच्या हेल्दी आणि तितक्याच टेस्टी रेसिपीज्.
साधं ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 2 टेबलस्पून दूध, चिमूटभर मीठ, चिमूटभर मिरी पूड, 2 टीस्पून बटर.
कृती : अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात मीठ, मिरपूड आणि दूध मिसळून पुन्हा चांगलं फेटा. तव्यावर मध्यम आचेवर बटर गरम करा. बटर वितळू लागलं की, त्यावर अंड्याचं मिश्रण घालून अंडं सेट होईपर्यंत एक-दोन मिनिटं शिजवा. नंतर परतवून आणखी एक मिनिट शिजवा आणि अलगद सर्व्हिंग डिशमध्ये काढा. सोबत सॅलडही सर्व्ह करा.
हाफ फ्राइड ऑम्लेट
साहित्य : 1 अंडं, काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, 4 टीस्पून तेल.
कृती : तेल तव्यावर पसरवा. तेल गरम झाल्यानंतर त्यावर अंड्यातील पांढरा भाग अलगदपणे गोलाकार पसरवा. नंतर त्याच्या मध्यभागी अंड्यातील पिवळा बलक अख्खा गोल पडेल, अशा प्रकारे घाला. मंद आचेवर हे ऑम्लेट सेट होऊ द्या. अंड्याचा पांढरा भाग सेट होऊन वरचा पिवळा बलक किंचित घट्ट झाला की, त्यात वरून मीठ आणि मिरी पूड घाला. हे हाफ फ्राइड ऑम्लेट सर्व्हिंग डिशमध्ये अलगदपणे काढा आणि ब्रेडसोबत सर्व्ह करा.
फ्लफी ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून दूध, अर्धा टीस्पून कढीपत्ता पूड, 1 टीस्पून तेल.
कृती : दोन्ही अंड्यातील पिवळा बलक आणि पांढरा भाग वेगवेगळ्या भांड्यात काढून ठेवा. आता पिवळ्या बलकामध्ये मिरची पूड, दूध आणि कढीपत्ता पूड घालून चांगलं फेटा. मिश्रण हलकं आणि फ्लफी होईपर्यंत फेटा. त्यासाठी एग बिटरचा वापर करता येईल. आता हे मिश्रण पांढर्या भागात एकत्र करा. मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात तेल गरम करा. त्यात अंड्यांचं मिश्रण घालून ऑम्लेट दोन्ही बाजूने सौम्य तपकिरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम फ्लफी ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत सर्व्ह करा.
हेल्दी ऑम्लेट
साहित्य : 4 अंड्यांमधील पांढरा बलक, 1 कप बारीक चिरलेले मशरूम, अर्धा कप मोड आलेले मूग जाडसर भरडलेले, अर्धा कप मटार जाडसर भरडलेले, एक तृतीयांश कप किसलेलं गाजर, एका कांद्याची पात बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून किसलेलं आलं, पाव टीस्पून मिरी पूड, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : एका भांड्यात अंड्यातील पांढरा भाग फेस येईपर्यंत चांगला फेटून घ्या. नंतर त्यात मशरूम, मूग, मटार, गाजर, कांद्याची पात, आलं आणि मिरी पूड घालून पुन्हा चांगलं फेटा. त्यात मीठ घालून पुन्हा फेटा. एका पॅनमध्ये 1 टीस्पून तेल गरम करून त्यात अंड्याचं थोडं मिश्रण घाला आणि मंद आचेवर दोन्ही बाजूने हलकं तपकिरी रंगाचं होईपर्यंत शिजवून घ्या.
टीप : यात कांदा, टोमॅटो, पालक यांसारख्या इतर भाज्यांचाही वापर करता येईल.
चीझ ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 3 टेबलस्पून दूध, अर्धा वाटी किसलेलं चीझ, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून पांढरी मिरी पूड, चिमूटभर मोहरी पूड, 1 टेबलस्पून बटर.
कृती : अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात मीठ, मोहरी पूड आणि मिरी पूड घालून पुन्हा चांगलं फेटून घ्या. मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून, त्यात बटर वितळवा. अंडं फेटून पॅनवर एकसारखं पसरवून घ्या. त्यावर किसलेलं चीझ पसरवा. ऑम्लेट एका बाजूने चांगलं भाजून झाल्यावर दुमडा आणि गरमागरम सर्व्ह करा.
क्वीक ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : अंडी फोडून त्यात लाल मिरची पूड, मीठ, हळद आणि कोथिंबीर घालून चांगलं फेटून घ्या. तव्यावर तेल किंवा तूप गरम करून त्यात हे मिश्रण थोडं थोडं घालून छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट दोन्ही बाजूने चांगलं भाजा. ऑम्लेट गरमागरम सर्व्ह करा.
मसाला ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 1 लहान टोमॅटो बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, स्वादानुसार मीठ, अर्धा टीस्पून गरम मसाला, चिमूटभर कढीपत्ता पूड, अर्धा टीस्पून जिरं पूड, 1 टीस्पून तेल.
कृती : एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून चांगलं एकत्र करा. नंतर त्यात गरम मसाला, कढीपत्ता पूड आणि मीठ घालून पुन्हा चांगलं फेटून घ्या. मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात तेल गरम करा आणि त्यावर जिरं पूड घालून काही सेकंद परतवा. नंतर त्यावर अंड्याचं मिश्रण घालून मंद आचेवर दोन्ही बाजूने हलकं तपकिरी रंगाचं होईपर्यंत शिजवून घ्या. गरमागरम मसाला ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत सर्व्ह करा.
मसाला बेसन ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 1 टीस्पून बेसन, 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून मिरी पूड, थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून चांगलं एकत्र करा. नंतर त्यात बेसन घालून चांगलं फेटून घ्या. या मिश्रणामध्ये गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या. मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात थोडं तेल गरम करा आणि त्यावर अंड्याचं मिश्रण घाला. त्यावर मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 टीस्पून तेल घालून झाकण लावून शिजवा. नंतर ऑम्लेट परतवून दुसर्या बाजूनेही शिजवून घ्या. गरमागरम मसाला बेसन ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत सर्व्ह करा.
क्वीक गार्लिक ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 2-3 टीस्पून बारीक चिरलेला कांदा, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 3 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, 2 टीस्पून पाणी, पाव टीस्पून हळद, स्वादानुसार काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : अंडी फेटून घ्या. त्यात तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य घाला आणि पुन्हा फेटून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात हे मिश्रण घाला आणि लहान-लहान ऑम्लेट तयार करून घ्या. ऑम्लेट मध्यम आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्या. हे ऑम्लेट सर्व्ह करताना त्यावर मिरी पूड घाला आणि ब्रेड किंवा पोळीसोबत सर्व्ह करा.
बिन्स चीझ ऑम्लेट
साहित्य : अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरलेला, पाव कप कॅन्ड बेक्ड राजमा जाडसर चिरलेला, 1 लसणाची पाकळी ठेचलेली, चिमूटभर सेलेरी सॉल्ट, चिमूटभर मिरची पूड, चिमूटभर वूस्टरशायर सॉस, 2 टीस्पून तेल, 2 अंडी, स्वादानुसार मीठ, पाव टीस्पून मोझारेला चीझ किसलेले.
कृती : एका पॅनमध्ये 1 टीस्पून तेल गरम करून त्यात टोमॅटो, कांदा, राजमा, लसूण, सेलेरी सॉल्ट,
मिरची पूड आणि वूस्टरशायर सॉस घालून एक चांगली वाफ येईपर्यंत परतवा. नंतर गरमच बाजूला काढून ठेवा. आता एका वाडग्यात अंडी फोडून त्यात मीठ घालून चांगलं फेटा. पॅनमध्ये मध्यम-मंद आचेवर उर्वरित तेल गरम करून त्यात अंड्याचं मिश्रण घाला. ते थोडे सेट झाल्यानंतर त्यावर राजमाचं मिश्रण घाला. त्यावर किसलेलं चीझ पसरवा. ऑम्लेटची खालची बाजू शिजल्यानंतर ते मधून दुमडा. दुमडलेलं बिन्स चीझ ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
पालक ऑम्लेट
साहित्य : 1 लहान जुडी पालकाची पानं, अर्धा कांदा बारीक चिरलेला, 4 अंडी, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार मिरपूड, 2 टीस्पून बटर.
कृती : पालकाची पानं स्वच्छ करून धुऊन ठेवा. पाण्यात मीठ घालून उकळा आणि त्यात पालकाची पानं 5 मिनिटं ठेवा. नंतर पाण्यातून काढून निथळून घ्या. तव्यावर मध्यम आचेवर 1 टीस्पून बटर गरम करून त्यावर कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर कांदा आचेवरून काढून पालकाच्या पानांमध्ये घाला. त्यात मीठ आणि मिरी पूड घालून व्यवस्थित एकत्र करा.
एका वाडग्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या. तव्यावर मध्यम आचेवर उर्वरित 1 टीस्पून बटर गरम करा. बटर वितळलं की, फेटलेल्या अंड्यात घालून एक मिनिट चांगलं फेटा. नंतर त्यात पालकाचं मिश्रण घालून व्यवस्थित एकत्र करा. आता हे मिश्रण पुन्हा तव्यावर घालून मंद आचेवर सेट होऊ द्या. सेट झालं की, पालकाचे ऑम्लेट सर्व्हिंग डिशमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा.
फ्रूट ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 1 टेबलस्पून पिठीसाखर, आवश्यकतेनुसार लोणी, चिमूटभर मीठ.
सारणासाठी : 1 ओला जर्दाळू किंवा पिच, 7-8 काळी द्राक्षं, 1 चिकू.
कृती : जर्दाळू किंवा पिच आणि चिकूची सालं काढून बारीक तुकडे करून ठेवा. एकेका द्राक्षाचे दोन-तीन तुकडे करा. अंडी फोडून चांगली फेटून त्याचं नेहमीप्रमाणे ऑम्लेट तयार करा. जाड कागदावर पिठीसाखर घालून त्यावर ते ऑम्लेट गरम असतानाच ठेवा. त्यावर मध्यभागी फळांचे तुकडे पसरवा. आता ऑम्लेटची डोशाप्रमाणे घडी करून ते गरमागरम सर्व्ह करा.
टीप : सारणासाठी इतर फळांचाही वापर करता येईल.
केळ्याचं ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, अर्धा टीस्पून लिंबूरस, 1 मोठं पिकलेलं केळं, 1 टेबलस्पून पिठीसाखर, 1 टेबलस्पून मलई, चिमूटभर मीठ.
कृती : पिकलेलं केळं व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यात साखर आणि लिंबूरस घालून चांगलं एकत्र करा. नंतर या मिश्रणात साय घालून एकत्र करा. हे मिश्रण डबल बॉयलरमध्ये गरम करा. केळ्याचं मिश्रण चांगलं गरम झाल्यानंतर आचेवरून उतरवा. अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्याचं नेहमीप्रमाणे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट गरम असतानाच जाड कागदावर पिठीसाखर घालून त्यावर ठेवा. त्यावर मध्यभागी केळ्याचं मिश्रण पसरवा. ऑम्लेटची डोशाप्रमाणे घडी करून ते गरमागरम सर्व्ह करा.
टीप : डबल बॉयलरमध्ये गरम करा म्हणजे, एका लहान भांड्यात केळ्याचं मिश्रण ठेवा. मध्यम आचेवर एका मोठ्या पातेल्यात पाणी ठेवून, त्यात केळ्याच्या मिश्रणाचं लहान भांडे ठेवा आणि शिजवा.
स्वीट ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 1 टीस्पून पिठीसाखर, 4 टीस्पून दूध, आवडीनुसार फ्लेवरचा जॅम, 2 टीस्पून बटर.
कृती : अंडी फोडून चांगली फेटून घ्या. त्यात मीठ, साखर आणि दूध घालून पुन्हा चांगलं फेटा. तव्यावर बटर गरम करून ते वितळलं की, त्यात हे मिश्रण घालून छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्या. सर्व्ह करताना ऑम्लेट सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर चमच्याने जॅम पसरवा. नंतर ऑम्लेटचा रोल करून ब्रेडबरोबर सर्व्ह करा.
मशरूम ऑम्लेट
साहित्य : 2 अंडी, 2 टेबलस्पून बटण मशरूम, 5 कांदे बारीक चिरलेले, स्वादानुसार मीठ, अर्धा टीस्पून पांढरी मिरी पूड, 1 टेबलस्पून बटर, चिमूटभर मोहरी पूड.
कृती : पॅनमध्ये थोडं बटर गरम करून त्यामध्ये बटण मशरूम 2 मिनिटं परतवून घ्या. नंतर मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून त्यात बटर घालून वितळवा. त्यात फेटलेल्या अंड्यांचं मिश्रण घालून थोडं सेट झाल्यानंतर त्यावर मशरूमचे तुकडे घाला. ऑम्लेटची खालची बाजू शिजल्यावर ते दुमडा. गरमागरम मशरूम ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत सर्व्ह करा.
ऑम्लेट डोसा
साहित्य : 2 टीस्पून डोशाचं पीठ, 2 अंडी, 1 कांदा बारीक चिरलेला, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : एका भांड्यात अंडी फोडून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, डोशाचं पीठ, मीठ, कोथिंबीर आणि मिरची पूड घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत, याची काळजी घ्या. मंद आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवून, त्यात 1 टीस्पून तेल घालून गरम करा. त्यावर डोशाचं मिश्रण पातळ पसरवा. खालच्या बाजूने डोसा तयार झाल्यानंतर वरच्या बाजूवर एक टीस्पून तेल पसरवून, डोसा उलटवा आणि दुसर्या बाजूनेही चांगला भाजून घ्या. गरमागरम ऑम्लेट मसाला डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.
ऑम्लेट स्टफ्ड डोसा
साहित्य : 2 टेबलस्पून डोशाचं पीठ, 2 अंडी, 2 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मिरी पूड, स्वादानुसार मीठ.
कृती : मंद आचेवर नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर 1 टेबलस्पून डोशाचं पीठ गोलाकार पसरवा. लगेच 1 अंडं फोडून अलगद या मिश्रणावर घाला. अंड्यातील पिवळा बलक फुटणार नाही, याची काळजी घ्या. नंतर त्यावर मीठ आणि मिरी पूड घाला. त्यावर 1 टीस्पून तेल घालून मिश्रण शिजू द्या. शिजल्यानंतर ऑम्लेट स्टफ्ड डोसा अलगद सर्व्हिंग डिशमध्ये काढा आणि चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
चायनीज व्हेजिटेबल ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, पाव वाटी गाजराचा कीस, पाव वाटी कोबीचा कीस, पाव वाटी कांद्याचा कीस, पाव वाटी सिमला मिरचीचे पातळ काप, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, वश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : पातेल्यात 4 टीस्पून तेल गरम करून त्यात सर्व भाज्या तीन-चार मिनिटं परतवून घ्या. नंतर त्यात मीठ आणि मिरी पूड घालून सर्व व्यवस्थित एकत्र करा आणि पातेलं आचेवरून खाली उतरवून ठेवा. हे मिश्रण थंड होऊ द्या. आता एका भांड्यात अंडी फोडून त्यात मीठ घालून चांगली फेटून घ्या. त्यात भाज्यांचं तयार मिश्रण घालून एकत्रित चांगलं फेटून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात हे मिश्रण घालून छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट दोन्ही बाजूने चांगलं भाजा. चायनीज व्हेजिटेबल ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
स्वीट अँड सोर ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, 4 टीस्पून सोया सॉस, 2 टीस्पून व्हिनेगर, 2 टीस्पून साखर, चिमूटभर अजिनोमोटो, अर्धा वाटी तेल.
कृती : सोया सॉस, व्हिनेगर, अजिनोमोटो आणि साखर एकत्र करून घ्या आणि बाजूला ठेवा. तव्यावर तेल गरम करून मंद आचेवर हाफ फ्राय अंडं तयार करा. ऑम्लेट वरूनही सेट झालं की, त्यावर तयार केलेला सॉस चमच्याने पसरवून लगेच सर्व्ह करा.
टीप : अंडं हाफ फ्राय करण्याऐवजी, ते फेटून त्यात तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालूनही ऑम्लेट तयार करता येते.
चायनीज प्रॉन्स् ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, पाव वाटी गाजराचा कीस, पाव वाटी कोबीचा कीस, पाव वाटी कांद्याचा कीस, पाव वाटी सिमला मिरचीचे पातळ काप, पाव वाटी बारीक चिरलेली कोळंबी, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : पातेल्यात 4 टीस्पून तेल गरम करून त्यात कोळंबी मध्यम आचेवर तीन-चार मिनिटं परतवून घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या घाला. तीन-चार मिनिटं परतवून त्यात मीठ आणि मिरी पूड घाला. सर्व व्यवस्थित एकत्र करून पातेलं आचेवरून खाली उतरवून थंड करत ठेवा. आता एका भांड्यात अंडी फोडून त्यात मीठ घालून चांगली फेटून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात अंड्याचं मिश्रण घालून छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट खालच्या बाजूने तयार झालं की, वरच्या बाजूवर भाज्यांचं तयार मिश्रण पसरवा. नंतर ऑम्लेटचा रोल करून घ्या. हे चायनीज प्रॉन्स् ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
शांघाय ऑम्लेट
साहित्य : 3 अंडी, 1 मोठा टीस्पून गाजराचा कीस, 1 मोठा टीस्पून कोबीचा कीस, 1 मोठा टीस्पून कांद्याचा कीस, 1 मोठा टीस्पून सिमला मिरचीचे उभे काप, 5-6 कोळंबी, स्वादानुसार मीठ व मिरी पूड.
कृती : कोळंबी स्वच्छ करून बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये थोड्या तेलावर भाज्या आणि कोळंबी एकत्र परतवून घ्या. कोळंबी शिजली की, त्यात मीठ आणि मिरी पूड घालून चांगलं परतवून आचेवरून उतरवा. आता अंड्यातील पिवळा बलक आणि पांढरा भाग वेगवेगळ्या भांड्यात काढून दोन्ही वेगवेगळे चांगले फेसून घ्या. नंतर फेसलेलं पिवळं बलक आणि पांढरा भाग एकत्र करून त्यात मीठ आणि मिरी पूड घालून एकत्र करा. आता तव्यावर थोडं तेल गरम करून त्यावर अंड्याचं मिश्रण घाला आणि ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट एका बाजूने तयार झालं की, त्यावर मध्यभागी उभट भाज्यांचं सारण पसरवा आणि डोशाप्रमाणे दुमडून घडी करा. गरमागरम शांघाय ऑम्लेट सॉससोबत सर्व्ह करा.
टीप : ऑम्लेट थंड झाल्यानंतर त्याच्या पट्ट्या चिरून, फ्राइड राइसमध्येही घालता येतील.
चायनीज चिकन ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, 4 टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव वाटी बारीक चिरलेल्या कांद्याच्या हिरव्या पाती, पाव वाटी तयार खिमा किंवा बोनलेस चिकन अगदी बारीक चिरून शिजवलेले, पाव टीस्पून काळी मिरी पूड, 1 टीस्पून चिली सॉस, 1 टीस्पून सोया सॉस, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : पाव वाटी पाण्यात कॉर्नफ्लोअर चांगलं एकजीव करा. दुसर्या भांड्यात अंडी फोडून फेटून घ्या. त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण व तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य आणि मसाले घालून चांगलं फेटा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून एकजीव करा. तव्यावर मध्यम आचेवर तेल गरम करून त्यावर हे मिश्रण घाला आणि छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. चायनीज चिकन ऑम्लेट दोन्ही बाजूने साधारण फिकट लालसर भाजून, गरमागरम सर्व्ह करा.
स्पॅनिश ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी हिरवे मटार, 2 हिरव्या मिरच्या, पाव वाटी उकडलेल्या बटाट्यांचे बारीक काप, 3 लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरलेल्या, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, 4 टीस्पून तेल, 4 टीस्पून बटर किंवा तूप.
कृती : हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक ठेचून घ्या. तव्यावर तेल गरम करून, त्यात कांदा आणि मटार मध्यम आचेवर परतवून घ्या. तीन-चार मिनिटांनंतर त्यात बटाटा, ठेचलेल्या लसूण-मिरच्या, मिरची पूड आणि मिरी पूड घालून चांगलं परतवा. नंतर त्यात बटर किंवा तूप घालून अंडी फोडून घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून मंद गॅसवर जाडसर पसरवा आणि पॅनला झाकण लावा. साधारण दोन मिनिटांनंतर ऑम्लेट उलटून खालची बाजूही भाजून घ्या. ऑम्लेट दोन्ही बाजूने चांगलं भाजलं की, आचेवरून खाली उतरवा. स्पॅनिश ऑम्लेटचे चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करून ब्रेडसोबत सर्व्ह करा.
स्पॅनिश चिकन ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, 4 टीस्पून पाणी, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पाव वाटी बोनलेस चिकन शिजवलेलं, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : बोनलेस चिकन, हिरव्या मिरच्या आणि कांदा एकत्र करून ठेवा. अंडी फोडून त्यात पाणी, मीठ आणि मिरी पूड घालून चांगलं फेटून घ्या. तव्यावर तेल गरम करून त्यात हे मिश्रण घालून छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. ऑम्लेट खालच्या बाजूने सेट झाल्यानंतर आच मंद करून ऑम्लेटवर बोनलेस चिकनचं तयार मिश्रण चमच्याने पसरवा. गरमागरम ऑम्लेटचा रोल तयार करून सर्व्ह करा.
इटालियन ऑम्लेट
साहित्य : 4 अंडी, 4 टीस्पून पाणी, 3 टीस्पून किसलेले चीझ, पाव वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, पाव वाटी गाजराचा कीस, पाव वाटी फ्लॉवरचा कीस, पाव वाटी तयार खिमा, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप.
कृती : अंड्यात पाणी घालून व्यवस्थित फेटून घ्या. त्यात तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य घाला आणि पुन्हा चांगलं फेटा. आता तव्यावर थोडं तेल किंवा तूप गरम करून त्यावर अंड्याचं मिश्रण घाला आणि छोटे-छोटे ऑम्लेट तयार करा. हे गरमागरम इटालियन ऑम्लेट ब्रेड आणि सॉससोबत सर्व्ह करा.