Close

25 छोट्या छोट्या गोष्टी, ज्या नात्यात मोठे बदल आणतील (25 Little Things That Will Make A Big Difference In A Relationship)

नाती अतूट बनवणं फार अवघड नसतं, त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि याची सुरुवात नवीन नात्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून करायला हवी.


1.या जगात कोणीच व्यक्ती परिपूर्ण नसते. त्यामुळे आपल्या जोडीदाराकडूनही तशी अपेक्षा ठेवू नये. जोडीदारास त्याच्यातील उणिवांसह स्वीकारणे, हेच खरे प्रेम आहे.
2.लग्नानंतर तुमचं स्वतःचं असं आयुष्य असतं, हे खरं आहे. तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकता. परंतु ज्या निर्णयामुळ0े नवरा-बायको दोघांच्याही आयुष्यावर परिणाम होणार असेल असे निर्णय एकट्याने घेऊ नका. उदाहरणार्थ - नोकरी बदलणे, लोन काढणे किंवा एखाद्या मोठ्या वस्तूची खरेदी करताना जोडीदारास विचारावे.
3.लग्न होताच एकमेकांना बदलण्याची मोहीम सुरू करू नका. जोडीदारास आपल्या मताप्रमाणे चालावे लागेल, हा विचार मनातून काढून टाका. यामुळे रुसवेफुगवे होतात. त्यापेक्षा एकमेकांना त्यांच्या चांगल्या - वाईट गुणांसह स्वीकारा.

  1. तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये, त्याच्याच हितासाठी काही बदल घडवून आणायचा आहे, तर त्याची सुरुवात टीकेने करू नका. त्याला प्रेमाने समजवा. अतिशय काळजीपूर्वक कृती करा आणि मुख्य म्हणजे संयम राखा. एका रात्रीत बदल घडेल अशी अपेक्षा ठेवू नका.
  2. छोट्या छोट्या गोष्टींतूनही आनंद मिळवा. मग रिमझिम पावसाच्या सरींत भिजणं असो वा मावळत्या सूर्याकडे पाहणे असो यातही आनंद लपलेला असतो, त्याचा जोडीने अनुभव घ्या. मोठ्या आनंदाची वाट पाहत, असे छोटे छोटे आनंदाचे क्षण जीवनातून निसटू देऊ नका.
  3. नात्यातील संवाद हरवू देऊ नका. नवरा-बायकोमध्ये संवाद नसेल तर नातं फार टिकणार नाही. आपल्या जोडीदारासोबत मनातील भावना शेअर करा. एकमेकांबद्दलची एखादी गोष्ट आवडली तर नक्की प्रशंसा करा.
  4. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांसाठी वेळ काढणे हे नातं टिकून राहण्यासाठी फार महत्वाचे आहे. तेव्हा वेळ नसल्याची सबब देऊन चालणारच नाही.
  5. सतत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप अशा सोशल नेटवर्किंग साइट्सवर बिझी राहू नका. तसेच ऑफिस आणि मित्र-मैत्रिणींमध्ये राहून आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंब आणि ऑफिस यांच्यामध्ये समतोल राखण्यास शिका.
  6. जीवनात चढ-उतार येतजात राहतात. यात आर्थिक वा कौटुंबिक समस्याही येऊ शकतात, अशा वेळी आपल्या जोडीदारास दोष देण्याऐवजी त्यावर तोडगा शोधून काढण्याचा प्रयत्न करा. मनावर ताण येऊ देऊ नका. हसत-खेळत राहिल्यास कितीही मोठी समस्या सहजपणे दूर होते.
  7. ज्या विषयावर दोघांची मतं जुळत नाहीत, त्या विषयावर वाद घालून, आपलं तेच खरं करू नका. यामुळे नात्यात तणाव येतो.
  8. स्वतःच स्वतःचं परीक्षण करा. आपल्या वर्तणुकीमधील जोडीदारास खटकणारी गोष्ट कोणती आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या जोडीदाराच्या भावना दुखावतील असे काहीही करायचे नाही, असे स्वतःच्या मनावर बिंबवा.
  9. नात्यात इगोला वाव मिळाला की दुरावा येण्यास वेळ लागत नाही.
  10. आपापल्या जबाबदार्‍या ओळखून प्रामाणिकपणे त्या पार पाडा. कुटुंबातील जबाबदार्‍या दोघांनी वाटून घ्या. एकावर भार पडल्यास त्यास नैराश्य येईल आणि मग नात्यावरही त्याचा प्रभाव पडेल.
  11. मुलांचा अभ्यास घेणे असो वा घरातील लहानसहान कामं करणे असो, सहकार्याची भावना असावी. विशेषतः जे नवरा-बायको दोघंही ऑफिसला जाणारे असतील तर त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. यामुळे समजूतदारपणा वाढतो तसेच नातंही मजबूत बनतं.
  12. पती-पत्नीमध्ये शिष्टाचार असणे गरजेचे आहे. बोलण्यात शिष्टाचार ठेवावा. प्रत्येक नवरा-बायकोमध्ये लहानसहान मतभेद असतात, म्हणून एकमेकांना वाईट शब्द बोलू नयेत. भांडण झालेच तरी तेथल्या तेथे मिटवून टाका.
  13. नेहमी जोडीदाराकडून झुकण्याची अपेक्षा करू नये. एखादे वेळी स्वतःही नमते घ्या. त्यामुळे काही मिनिटात भांडण मिटेल आणि रागही मावळेल.
  14. एकमेकांवर अधिकार गाजवू नका. जोडीदारास मुठीत ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे, यामुळे नात्यात दुरावाच येईल.
  15. जोडीदारासोबत भांडणात जिंकण्यापेक्षा एकमेकांचे प्रेम जिंका. भले मग त्यासाठी तुम्हाला भांडणात हार मानावी लागली तरी चालेल.
  16. नवरा-बायकोंमधील लैंगिक संबंध जर व्यवस्थित नसतील तरी नातं कोलमडतं. शक्यतो ही परिस्थिती येऊ द्यायची नाही.
  17. क्वालिटी टाइम आणि पर्सनल स्पेस यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा. एकमेकांसाठी काही वेळ काढून, एकमेकांसोबत बसून बोला, आपल्या मनातील भावना व्यक्त करा. पर्सनल स्पेस म्हणजे आपल्या जोडीदारास थोडा वेळ मोकळे सोडा. म्हणजे त्यास आपल्या आवडीच्या कामासाठी वेळ देता येईल.
  18. लग्नाचा नवरा म्हणून त्यास पदरास बांधून ठेवू नका. त्याला आपल्या मित्रांसोबत बाहेर पार्टीला जायचे असल्यास हसतहसत जाण्याची परवानगी द्या. तसेच बायको आपल्या माहेरच्या व्यक्तींसोबत फोनवर बोलत असेल तर तिला टोकू नका.
  19. जेवण चांगले करता येत नाही, तुला कोणतेच काम नीट करता येत नाही, माझं काहीही ऐकत नाही… असा सतत तक्रारींचा पाढा पढत राहू नका. यामुळे चिडचिड होते.
  20. तडजोड करायला शिका.
  21. जोडीदाराच्या काही सवयी आणि चुकांकडे दुर्लक्ष करा. काही वेळा सहनशीलता जरुरी असते.
  22. जोडीदारावर विश्वास असू द्या. त्याच्या इच्छांचा सन्मान करा. एकमेकांना बरोबरीचा दर्जा द्या.

Share this article