महिलांच्या समस्यांवर भाष्य करणारे अनेक स्त्री प्रधान चित्रपट, अनेक भाषांतून काढले गेले आहेत. महिलांनी त्यांच्यासाठीच बनविण्यात आलेले हे चित्रपट पाहायलाच हवेत. कारण अशा चित्रपटांतून महिलांच्या जीवनातील कधीही न स्पर्शिलेले विषय दाखविण्यात आलेले आहेत. यापैकी १० स्त्री प्रधान चित्रपटांबद्दल आपण बोलूया. या चित्रपटांनी अनेक सामाजिक रुढींवर आक्षेप घेत त्या मोडीत काढल्या आहेत आणि समाजाला नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. तेव्हा हे चित्रपट जर तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पाहा.
१) क्वीन (Queen)
स्त्री प्रधान चित्रपटांबद्दल बोलत असताना कंगना रणौतचा 'क्वीन' चित्रपट वगळून चालणार नाही. स्त्रियांना आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता आता पुरुषांच्या पाठिंब्याची गरज नाही, असा आशय या चित्रपटातून मांडला गेला. आणि चित्रपटातून सांगितल्या गेलेल्या या संदेशामुळेच क्वीन यशस्वी ठरला आहे. अभिनेत्री कंगना राणौतने आपल्या दमदार अभिनयाने स्त्री मनातील भावना उत्कटतेने प्रदर्शित केल्या आहेत. तुम्ही अजूनही क्वीन पाहिला नसेल तर जरूर पाहा.
२) द डर्टी पिक्चर (The Dirty Picture)
'द डर्टी पिक्चर' हा सिनेमा बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्री विद्या बालनच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची कथा ऐंशीच्या दशकातील दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारीत आहे. रुपेरी पडद्याच्या झगमगाटामागे दडलेल्या अंधाराबाबत भाष्य करणारा हा चित्रपट आहे. स्त्री शरीराबद्दलची लोकांची मानसिकता देखील या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाची खूपच प्रशंसा झाली होती.
३) लिपस्टिक अंडर माय बुर्का (Lipstick Under My Burka)
'लिपस्टिक अंडर माय बुर्का' हे नाव प्रथमच ऐकताना विचित्र वाटतं. हा सिनेमा चार वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांची व्यथा मांडणारा आहे. यामधील स्त्रियांचा स्वतंत्रपणे जीवन जगण्यावर विश्वास आहे. कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, आहना कुमरा, पल्बिता बोरठाकुर यांसारख्या अभिनेत्रींनी या सिनेमात काम केले आहे. तेव्हा हा चित्रपट वादग्रस्त ठरवला गेला असल्याने प्रदर्शित होण्यापूर्वी सेंसर बोर्डाकडून परवानगी मिळण्यासाठी बराच वेळ लागला होता. परंतु स्त्री प्रधान चित्रपटांचा उल्लेख केला जात असताना लिपस्टिक अंडर माय बुर्काचं नाव नक्की घेतलं जातं.
४) पार्चड (Parched)
पार्चड म्हणजे दुष्काळ. या चित्रपटामध्ये हा शब्द गावाकडील तीन स्त्रियांच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे प्रदर्शित केला गेला आहे. 'पार्चड' चित्रपटामध्ये पुरुष प्रधान मानसिकता, स्त्रियांवरील अत्याचार, बालविवाह यांसारख्या रुढींबाबतचे कटु सत्य अतिशय परखडपणे दर्शविले आहे. हा चित्रपट २४ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला असून या चित्रपटाने १८ पुरस्कार मिळवले आहेत.
५) अँग्री इंडियन गॉडेसेस (Angry Indian Goddesses)
'अँग्री इंडियन गॉडेसेस' या सिनेमाचं कथानक पाच मुलींभोवती फिरताना दिसतं. या मुली हसतात, रडतात, मस्ती करतात अन् त्रासही सहन करतात. या चित्रपटामध्ये मुलींची छेड, कोर्टात न्याय न मिळणे, आई वडिलांचं प्रेमही न मिळणे, अशा अनेक सामाजिक समस्यांवर भाष्य केले आहे. महिलांनी हा चित्रपट जरूर पाहिला पाहिजे.
६) चांदनी बार (Chandni Bar)
'चांदनी बार' हा मुंबईतील बारबालांच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे. मधुर भंडारकरच्या या चित्रपटामधील तब्बूच्या अभिनयाने बारबालांचे जीवन अतिशय जवळून दर्शविलेले आहे. चांदनी बार या चित्रपटासाठी तब्बूला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर मिळालाच आणि या चित्रपटाला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
७) फायर (Fire)
दीपा मेहता यांच्या या चित्रपटामध्ये दोन स्त्रियांमधील समलैंगिक संबध दाखविण्यात आले आहेत. या चित्रपटास सेंसर बोर्डाकडून हिरवा कंदिल मिळवण्यासाठी दोन वर्षं वाट पाहावी लागली. दोन वर्षांनंतर फक्त प्रौढांसाठी म्हणत हा चित्रपट सिनेमागृहात दाखवला गेला. या चित्रपटातील शबाना आझमी आणि नंदिता दास यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
८) नीरजा (Neerja)
'नीरजा' हा सोनम कपूरच्या कारकीर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटामध्ये विमान अपहरणा दरम्यान एक हवाईसुंदरी धैर्याने आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी कशी पार पाडते, याचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले गेले आहे. या चित्रपटामध्ये कुठेही हिरो वा अभिनेत्याची उणीव भासत नाही, ही नीरजा चित्रपटाची जमेची बाजू आहे.
९) मॉम (Mom)
बॉलिवूडची चांदनी श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु त्यांच्या 'मॉम' या चित्रपटाचे स्त्री प्रधान चित्रपटांमध्ये खास स्थान आहे. एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते, हे या चित्रपटामध्ये दाखविले आहे. संपूर्ण चित्रपट श्रीदेवी म्हणजेच मॉम भोवती फिरताना दिसतो. या चित्रपटातही नायकाची कुठेही गरज भासत नाही.
१०) पिंक (Pink)
तापसी पन्नूचा 'पिंक' सिनेमाही नेहमीच्या पठडीतला नाही. या चित्रपटाची कथा तीन महिलांभोवती फिरते आणि समाजातील महिलांबाबत विचार करायला भाग पाडते. पिंकमधील अमिताभजींची भूमिकाही प्रशंसनीय आहे.