मासिक पाळी हे नियमित ऋतुचक्र आहे. त्याचं दडपण अथवा भिती न बाळगता नित्यकर्म समजून सहज वागलं पाहिजे. त्यामुळेच व्यायाम केला पाहिजे. या काळात व्यायाम केल्याने महिलांना बरेच फायदे होतात.
मासिक पाळी दरम्यान बव्हंशी महिलांना वेदनांमुळे जीव नकोसा होतो. कामात लक्ष लागत नाही. चिडचिड होते, अस्वस्थता वाढते. अशा मानसिक अवस्थेत व्यायाम करावा की नाही, हा प्रश्न पडतो. यावर काही आरोग्य तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, मासिक पाळी हे नियमित ऋतुचक्र आहे. त्याचं दडपण अथवा भिती न बाळगता नित्यकर्म समजून सहज वागलं पाहिजे. त्यामुळेच व्यायाम केला पाहिजे. या काळात व्यायाम केल्याने महिलांना बरेच फायदे होतात.
पाळीच्या दिवसात महिलावर्गाच्या शरीरात बरेच हार्मोनल बदल होतात. त्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत शरीर बरेच कमजोर होते व थकवा येतो. असं असलं तरी चालण्याचा व्यायाम व इतर व्यायाम करणे; तसेच योगा करणे, या क्रिया चालू ठेवल्या तर चांगलेच असते. या क्रियांनी फिटनेस राहील व वेदना कमी होतील. होणारे इतर काही फायदे असे आहेत.
- मासिक पाळी दरम्यान वेदना वाढतात आणि थकवाही येतो. व्यायाम केल्याने या व्याधी कमी होऊ शकतात.
- व्यायाम केल्याने एन्डॉर्फिन नावाचे हार्मोन शरीरात स्रवते. ते वेदनाशमकाचे काम करते. त्यामुळे वेदना कमी होतात.
- व्यायामाने शरीरातील रक्तसंचार सुरळीत होतो. त्यामुळे शरीर हलके वाटते. उत्साह वाढतो.
- ज्या स्त्रियांना पाळी दरम्यान जास्त त्रास होतो. त्यांना या काळात व्यवस्थित व्यायाम केल्याने आराम पडू शकतो.
- या काळात चालण्याचा व्यायाम घेणे अधिक श्रेयस्कर. त्याच्याने वेदना जाणवत नाहीत.
- या काळात व्यायाम किमान 30 ते 45 मिनिटे करणे गरजेचे आहे.
- पाय आणि छाती यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होईल, असा कोणताही व्यायाम पाळीत करू नका.
- एरव्हीसुद्धा एरोबिक्स केल्याने वेदना कमी होतात. तेव्हा मासिक पाळीच्या वेदना तर निश्चितच कमी होतील.
- पाळीच्या काळात मूड बिघडतो. चिडचिड होते. व्यायाम केल्याने मन स्थिर होतं. शरीर हलकं होतं. वेदना कमी होतात. त्यामुळे मूड ठाकठीक राहतो.
- एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे पाळीच्या काळात करण्याचे व्यायाम हलकेफुलके असले पाहिजेत. व्यायामाचे अवघड प्रकार करू नयेत.