अभिनेत्री नुसरत भरुचा आणि सोहा अली खान स्टारर हॉरर सुपरनेचुरल ड्रामा चित्रपट 'छोरी 2'चा ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाला आहे. 'छोरी 2'चा धमाकेदार ट्रेलर हा तुम्हाला नक्कीच थक्क करेल. 'छोरी 2'चं दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केलंय. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी अॅबंडंशिया एंटरटेनमेंट बॅनरखाली अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रसिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या यूजर्स नुसरत आणि सोहाचं कौतुक करत आहेत. ट्रेलरमधील या दोघांचा अभिनय खूप दमदार आहे.
'छोरी 2'चा ट्रेलर प्रेक्षकांना एका भयानक जगात घेऊन जात आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला एक महिला लहान मुलीची गोष्ट सांगताना बोलते की, “एका राज्यात एक राजा होता. एक दिवस त्याच्या घरी एका मुलीने जन्म घेतला. राजाला राग आला तेव्हा एक मुलगी विचारते, का?” अशी ट्रेलरची सुरुवात आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये समाजातील कटू सत्य बाहेर आणले आहे. 'छोरी' हा चित्रपट अंधश्रद्धा आणि काळ्या जादूवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कहाणीत एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसते. ट्रेलरमधील काही दृश्ये प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहेत.
या चित्रपटात नुसरतसोबत सोहा अली खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यात सोहाचा एक वेगळा अंदाज दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गश्मीर महाजनी, सौरभ गोयल आणि पल्लवी अजय सारखे कलाकार देखील दिसत आहेत, जे कथा आणखी रोमांचक बनवणार आहेत. हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी, 'छोरी 2' हा एक उत्तम पॅकेज असू शकतो, जो तुम्हाला घाबरवेल आणि विचार करायलाही भाग पाडेल.
2021मध्ये रिलीज झालेल्या 'छोरी' चित्रपटानं अनोख्या कहाणीनं प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. 'छोरी' हा चित्रपट 'लपाछपी' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'छोरी'च्या यशानंतर, निर्मात्यांनी चार वर्षांनी त्याचा सीक्वेल आणला आहे. चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भीती, प्रेम, भावना आणि रहस्यमय गोष्टींचे मिश्रण पाहायला मिळेल. 'छोरी 2'च्या ट्रेलरमध्ये हे सर्व दिसत आहे, त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला खूप आवडेल.