रातां लंबियां, तेरा बन जाऊंगा, तुम ही आना अशी गाणी गाऊन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गायक जुबिन नौटियालने मढ बेटावरील अपार्टमेंटमध्ये एक आलिशान घर विकत घेतले आहे. रहेजा एक्झॉटिका इमारतीत असलेल्या या फ्लॅटची किंमत ५ कोटी रुपये आहे. १९३३ चौरस फुटांचा हा फ्लॅट ४ बेडरुम्सचा आहे. स्कायप्लेक्स अपार्टमेंटमधील हा फ्लॅट समुद्राच्या दिशेला आहे.
सर्व सुखसोयींनी सज्ज असलेल्या इमारती मढ बेटावर उभ्या राहिल्या असून बॉलिवूड कलाकारांना त्या भागाचे आकर्षण आहे. शांत-निवांत या परिसरात जुने बंगले असून तिथे चित्रपट व मालिकांचे चित्रण होत असते. या विभागात आलिशान घर घेतल्याने जुबिन आता अर्चना पूरण सिंह, पंकज त्रिपाठी व विक्रांत मैसी सारख्या नामांकित कलाकारांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.